संशोधन करताना संशोधकाला वैज्ञानिक पद्धतीने किंवा विशिष्ट नियमानुसार कार्य करावे लागते. कारण संशोधनाच्या माध्यमातून नवीन  तथ्ये आणि नवीन विचार शोधले  जातात. संशोधन करणे सोपे काम नाही. ते योग्य पद्धतीने करण्यासाठी शिस्त, चिकाटी आणि मेहनतीची आवश्यकता असते. संशोधन करताना अनेक अडचणी येतात त्यावर मात करून निष्कर्ष काढावे लागतात. निष्कर्षांची उपयुक्तता पटवून द्यावी लागते. निष्कर्षाच्या आधारावर सिद्धांत मांडणी केली जाते. हे सर्व कार्य करतांना संशोधकाला पुढील पायऱ्या, टप्पे किंवा मार्गाने मार्गक्रमण करावे लागते.


समस्या  सूत्रण व विषय निवड- (Formation of Problem) संशोधनाची पहिली पायरी म्हणजे संशोधनासाठी विषयाची निवड करणे होय. विषय निवडल्या शिवाय संशोधकाला पुढचा मार्ग गवसणार नाही. विषय निवडताना  संशोधकाची आवड, मार्गदर्शकाचे मत, विषयाचा आवाका, माहितीची उपलब्धता, विषयाचे महत्त्व  आणि उपयुक्तता इत्यादी गोष्टींचा विचार करावा लागतो. मार्गदर्शकाने संशोधकाला आवडीनुसार विषय निवडण्याची मुभा द्यावी. विषय लादू नये. कारण आवडीच्या विषयावर संशोधक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो. विषय निवडीनंतर संशोधनाची दिशा कळू शकते. समस्या सूत्रण अत्यंत कठीण कार्य असते. कारण चुकीच्या विषय निवडीमुळे संशोधन भटकू शकते म्हणून अत्यंत गांभीर्याने आणि विचारपूर्वक समस्या सूत्रण मार्गदर्शक आणि संशोधकाने करणे गरजेचे असते.


संशोधनाचा आराखडा- (Research Design)संशोधन विषय निश्चित झाल्यानंतर संशोधनाचा आराखडा तयार करणे आवश्यक असते. आराखड्यात संशोधनाचे महत्त्व, व्याप्ती, आवश्यकता, मर्यादा आणि संशोधन पद्धतीच्या वापराबाबत तपशीलवार माहिती दिली जाते. संशोधन आराखडा तयार करण्यासाठी संशोधन पद्धतीची माहिती संशोधकाला असणे गरजेचे असते. संशोधन आराखडा संशोधनाला दिशा देण्याचे काम करत असल्याने तो काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक करणे आवश्यक असते. आराखड्यात निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार संशोधनाची वाटचाल झाली पाहिजे.

Post a Comment